- ‘मतदारांचा लाभतोय भरघोस पाठिंबा’ – पांडाभाऊ साने…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १५ डिसेंबर २०२५):- नियोजित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ टाळगाव–चिखली परिसरात राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वसाधारण महिला गटातून भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवार रुपाली पांडाभाऊ साने यांचा प्रचार सध्या जोमात सुरू आहे. युवा नेते पांडाभाऊ साने यांच्या सक्रिय सहभागातून रुपालीताई पांडाभाऊ साने या प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहेत.
म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, मोरेवस्ती आदी भागांत प्रत्यक्ष गाठीभेटी, घराघरांत संवाद, नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर उपाययोजनांची दिशा मांडणे यावर त्यांच्या प्रचाराचा भर दिसून येत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीटलाईट, महिला व युवकांचे प्रश्न याबाबत नागरिकांकडून मोकळेपणाने मते व्यक्त केली जात असून त्या समस्या महापालिकेत प्रभावीपणे मांडण्याचा निर्धार रुपालीताई साने यांनी व्यक्त केला आहे.
या प्रचारादरम्यान मतदारांमध्ये यंदा परिवर्तन करण्याची स्पष्ट भावना दिसून येत असून, “प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि सातत्याने संपर्कात राहणारे नेतृत्व हवे” अशी अपेक्षा अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. विशेषतः महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या गाठीभेटींना मिळत आहे.
युवा नेते पांडाभाऊ साने यांनीही प्रचारादरम्यान सांगितले की, टाळगाव–चिखली प्रभागाला विकासाच्या नव्या दिशेने नेण्यासाठी प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. त्याच दृष्टीने रुपाली साने या सातत्याने काम करत असून आगामी महापालिका निवडणुकीत प्रभागात परिवर्तन घडवण्यासाठी नागरिकांनी एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.












