- मध्यवर्गीय-कामगारवर्गीय भागात अपुऱ्या सुविधांमुळे मतदारांचा विकास खुंटला?…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२५):- कुदळवाडी, चिखली गावठाण, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी आणि राजे शिवाजीनगर सेक्टर १६ या भागांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक २ मध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरण झाले आहे. निवासी संकुले, शासकीय इमारती आणि शैक्षणिक संस्थांमुळे या प्रभागाचे महत्त्व वाढले असले, तरी त्याच वेळी मूलभूत सुविधांचा अभाव आणि नियोजनशून्य विकासामुळे नागरिकांचा संताप वाढताना दिसत आहे.
बहुसंख्य मध्यमवर्गीय व कामगारवर्गीय नागरिक वास्तव्यास असलेल्या या प्रभागात सावता माळी, बोल्हाई मळा आणि सेक्टर १६ परिसरात दूषित व कमी दाबाने येणारा पाणीपुरवठा हा गंभीर प्रश्न ठरला आहे. दुसरीकडे सीएनजी पंप चौक, विठ्ठल मंदिर चौक आणि शिवरस्ता परिसरात दिवसभर वाहतूककोंडीचा सामना करावा लागत असून, येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिस व वॉर्डन नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
जाधववाडीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाशेजारी अधिकृत भाजीमंडई असतानाही अनेक भाजी-फळविक्रेते रस्त्यावर अतिक्रमण करून बसत असल्याने रहदारीच्या वेळेत मोठी कोंडी होते. आरक्षित रामायण मैदानांवर अनधिकृत वाहनतळ सुरू असल्याने खेळाडू व लहान मुलांना मैदानाचा उपयोग करता येत नाही, अशी तक्रार पालकांकडून केली जात आहे.
प्रभागात जिल्हा सत्र न्यायालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, पोलिस आयुक्तालय, महसूल विभागाचे कार्यालय यांसारखी महत्त्वाची कामे सुरू असली, तरी त्यांची गती अत्यंत मंद आहे. सीएनजी पंप ते सावता माळी मंदिरदरम्यानचे पदपथ गेल्या सहा महिन्यांपासून अपूर्ण आहेत. बोल्हाई माता मंदिराच्या अंतर्गत रस्त्यावर भूमिगत चेंबर आणि प्रचंड धूळ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
काही सकारात्मक बाबीही दिसून येतात. सावता माळी मंदिराच्या पाठीमागील तळे उद्यान नागरिकांसाठी खुले करण्यात आले असून, रामायण मैदानात उभारलेल्या पाण्याच्या टाक्यांमुळे पाणीटंचाई काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, ही कामे अपुरी असून पुढील टप्प्यात व्यापक उपाययोजनांची गरज आहे.
खेळाडूंकरिता रामायण मैदानात सुविधा, जाधववाडी-बोऱ्हाडेवाडी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, चिखली-पिंपरी थेट पीएमपी बससेवा व बसथांब्यांवर शेड, सावता माळी मंदिर ते आहेरवाडी चौकातील धोकादायक उतार कमी करणे, तसेच भविष्यात वाढणारी वर्दळ लक्षात घेऊन रस्ते रुंदीकरण आणि उड्डाणपुलाची उभारणी या प्रमुख मागण्या नागरिकांकडून पुढे येत आहेत.
चार सदस्यीय रचनेच्या या प्रभागात सुमारे ६९ हजार मतदार असून, आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधील अपूर्ण विकासकामे आणि नागरी समस्याच केंद्रस्थानी राहणार, हे स्पष्ट संकेत मिळत आहेत.












