- मोशी–डुडुळगाव–चऱ्होलीतील विकासकामांचा वेग असमान…
- मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा वाढता असंतोष कोणाच्या पथ्यावर…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२५):- मोशी, डुडुळगाव आणि चऱ्होली परिसराचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक ३ सध्या पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या विस्ताराचे प्रतीक बनत आहे. गृहप्रकल्प, व्यावसायिक संकुले आणि पायाभूत सुविधांमुळे हा भाग शहराची नवी ओळख ठरत असला, तरी अनेक महत्त्वाची विकासकामे वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्याने नागरी समस्या गंभीर होत चालल्या आहेत.
डुडुळगाव ते धायकरवाडी १८ मीटर रस्ता, मोशी वाय जंक्शन, चऱ्होली फाटा ते गाव, पठारेमळा, तळेकरनगर आणि शिवाजीवाडीतील रस्ते अद्याप अपूर्ण आहेत. पुणे–नाशिक महामार्ग प्रभागातून जात असल्याने रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, बाजूपट्टे आणि सेवा रस्त्यांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे धूळप्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना पाणीपुरवठा कमी दाबाने होणे, कचरा संकलनासाठी अपुऱ्या घंटागाड्या, ड्रेनेज आणि विद्युत कामांची रखडलेली कामे या समस्या अधिक तीव्र होत आहेत. मुख्य चौकांतील वाहतूक व्यवस्थापनाचा अभाव आणि बीआरटी मार्गावरील अडचणी यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचे नागरिक सांगतात.
दरम्यान, काही महत्त्वाची कामे पूर्ण झाल्याने दिलासा मिळाला आहे. मोशी–चऱ्होली–डुडुळगाव येथे स्मशानभूमी, नागेश्वर विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, टपाल कार्यालये, अग्निशमन केंद्र आणि मैदानांची उभारणी पूर्ण झाली आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही साधने अपुरी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्रभागात उद्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये, तसेच चऱ्होली व डुडुळगाव येथे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता भासत आहे. अपूर्ण क्रीडांगणे, डीपी रस्ते आणि महामार्गालगतची पायाभूत कामे पूर्ण करण्याची मागणीही जोर धरत आहे.
चार सदस्यीय रचनेच्या या प्रभागात सुमारे ७२ हजारांहून अधिक मतदार असून, अनुसूचित जाती, मागास प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण असे आरक्षण लागू आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधील रखडलेली विकासकामे, वाहतूक कोंडी आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न हेच राजकीय चर्चेचे केंद्र ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.












