- पिंपळे निलख, वाकड आणि कस्पटे वस्तीतीतून वाढतोय जनाधार..
- दिग्गज उमेदवारांची वाढली डोकेदुखी; उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींचा सकारात्मक प्रतिसाद?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. १७ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २६ मध्ये राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. पिंपळे निलख, वाकड आणि कस्पटे वस्तीचा समावेश असलेल्या या प्रभागात भाजपकडील उमेदवारीसाठी विशेषतः महिला गटात तीव्र चुरस निर्माण झाली आहे.
अंतिम आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक २६ मध्ये अनुसूचित जाती (SC – पुरुष), मागासवर्ग प्रवर्ग (OBC – महिला), सर्वसाधारण (खुला) आणि सर्वसाधारण महिला अशा चार जागा निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे भाजपमधील इच्छुकांनी जनसंपर्क वाढविण्यावर भर देत तयारीला सुरुवात केली आहे. पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्ते, तसेच नव्या चेहऱ्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे.
या गर्दीत स्नेहा कलाटे यांची कार्यपद्धती मात्र वेगळी ठरत असून, त्यांच्या प्रचारशैलीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. कोणतेही अधिकृत राजकीय पद नसतानाही त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ‘रणजित आबा कलाटे फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम, घराघरांत जाऊन संवाद आणि स्थानिक प्रश्नांची थेट दखल घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. या घर-टू-घर संपर्काला मिळणारा प्रतिसाद पाहता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
उच्च शिक्षण घेतलेल्या स्नेहा कलाटे यांचा शांत पण प्रभावी जनसंपर्क, तसेच महिलांशी व तरुणांशी साधलेला संवाद प्रतिस्पर्धकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या वाढत्या संपर्कामुळे प्रभागातील वातावरण बदलत असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
दरम्यान, भाजपकडून उमेदवारी देताना माजी नगरसेवक कस्पटे, चोंधे तसेच अलीकडे पक्षात दाखल झालेल्या साठे यांच्या कुटुंबीयांना संधी दिली जाणार का, की गेल्या अनेक दशकांपासून भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन कार्यरत असलेल्या, राष्ट्रसेविका समितीच्या सक्रिय सदस्या असलेल्या कलाटे कुटुंबातील स्नेहा कलाटे यांना प्राधान्य मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप आणि भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर प्रभाग क्रमांक २६ मधील अंतिम राजकीय चित्र स्पष्ट होणार असून, भाजपच्या महिला उमेदवारीचा निर्णय अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे.












