- राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे राजकीय समीकरणांना कलाटणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. १७ डिसेंबर २०२५) :- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेरगाव प्रभाग क्रमांक २३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळाले आहे. सामाजिक, व्यावसायिक आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या योगिताताई महेश बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे प्रभागातील राजकीय गणिते नव्याने मांडली जात असल्याचे चित्र आहे.
या पक्षप्रवेशावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. माजी नगरसेवक व गटनेते कैलास बारणे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, माजी नगरसेवक सतीश दरेकर यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली.
योगिता ताई बारणे या संगणक अभियंता असून त्या सध्या बांधकाम क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. आधुनिक शिक्षण, व्यवस्थापन कौशल्य आणि सामाजिक जाण यांचा समतोल त्यांच्या कामातून दिसून येतो. त्यांचे पती महेश बारणे हे देखील बांधकाम व्यवसायात परिचित नाव असून, अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून स्वतःचा व्यवसाय उभा करत त्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे बारणे कुटुंबाचा थेरगाव परिसरात विश्वासार्ह संपर्क मोठ्या प्रमाणावर आहे.
योगिता ताई यांचे सासरे कै. सुदामराव बारणे हे थेरगावमधील आदराचे व्यक्तिमत्त्व होते. उच्च शिक्षण, धार्मिक प्रवृत्ती आणि सामाजिक जाण यामुळे त्यांना ‘वकील साहेब’ म्हणून ओळखले जात असे. थेरगाव परिसरात औद्योगिक व सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
तसेच योगिता ताई यांचे माहेर कासारवाडी येथील लांडे कुटुंबात असून, विजू शेठ लांडे व विलास शेठ लांडे यांच्याशी असलेले नाते त्यांच्या सामाजिक व राजकीय संपर्काला अधिक विस्तार देणारे आहे. शेती, सामाजिक कार्य आणि बांधकाम व्यवसायात नाव कमावलेले बारणे कुटुंब थेरगावमध्ये प्रभावी घटक मानले जाते.
या पार्श्वभूमीवर योगिता ताई बारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश हा केवळ वैयक्तिक राजकीय निर्णय न राहता, प्रभाग क्रमांक २३ साठी निर्णायक टप्पा ठरत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या प्रवेशासाठी माजी नगरसेवक कैलास बारणे यांनी संघटनात्मक पातळीवर विशेष पुढाकार घेतला. त्यामुळे प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल अधिक सक्षम होऊन आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे पारडे जड राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












