- राजकीय संघर्ष पोहोचला शिगेला..
- अनुभव आणि परंपरा विरुद्ध तरुणाई व बदल..
- पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19 डिसेंबर 2025) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणुक जाहीर होताच शहरातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. त्यात रहाटणी येथील प्रभाग क्रमांक २७ हा सध्या सर्वाधिक चर्चेत असून, याचे मुख्य कारण म्हणजे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गात सासरे आणि जावई राज तापकीर यांच्यात सुरू असलेली थेट तिकिटासाठीची रस्सीखेच. कौटुंबिक नातेसंबंध असूनही राजकीय मैदानात दोघेही आमनेसामने उभे ठाकल्याने या प्रभागाकडे संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित झाले आहे.
दोन्ही इच्छुकांकडून तिकीट मलाच मिळणार, असे ठाम दावे केले जात असून, १६ डिसेंबर रोजी दोघांनीही पक्षाच्या अधिकृत मुलाखती दिल्या आहेत. एका बाजूला प्रदीर्घ राजकीय अनुभव, अनेक वर्षे प्रभागातील जनतेशी जुळलेली नाळ, स्थानिक प्रश्नांवर केलेले सातत्यपूर्ण काम आणि कार्यकर्त्यांचे बळ हे मुद्दे पुढे केले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला पक्षाचे तरुणांना संधी देण्याचे धोरण, नव्या नेतृत्वाला पुढे आणण्याची भूमिका, तसेच बदलाची अपेक्षा असलेला तरुण मतदार वर्ग हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांमध्येही चर्चा रंगली असून, अनुभवाला साथ द्यावी की नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही नागरिकांच्या मते, विकासकामांचा अनुभव आणि प्रशासनाशी असलेली ओळख महत्त्वाची आहे, तर काहींच्या मते तरुण नेतृत्वामुळे नव्या कल्पना, गती आणि पारदर्शकता येऊ शकते. त्यामुळे ही लढत केवळ दोन व्यक्तींमधील नसून, दोन विचारधारांमधील असल्याचेही बोलले जात आहे.
विशेष म्हणजे हा संघर्ष केवळ स्थानिक पातळीवर न राहता थेट मुंबईपर्यंत, मुख्यमंत्र्यांच्या दरबारी पोहोचल्याची चर्चा आहे. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारीचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अत्यंत गांभीर्याने घेतला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षश्रेष्ठी कोणाच्या बाजूने कौल देतात, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
दरम्यान, इच्छुक उमेदवार राज तापकीर यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे. पक्षाचे तरुणांना संधी देण्याचे धोरण, गेल्या अनेक वर्षांत प्रभागातील जनतेमध्ये प्रत्यक्ष जाऊन सोडवलेले प्रश्न, नागरिकांचा आपल्यावरील विश्वास, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि पक्षनिष्ठा लक्षात घेता पक्ष आपल्यालाच संधी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मागील पंचवार्षिकप्रमाणे यंदाही पूर्ण पॅनल निवडून येईल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रभाग क्रमांक २७ मधील ही सासरे–जावई यांच्यातील तिकिटाची लढत आता निवडणुकीच्या रणधुमाळीत विशेष ठरत असून, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे केवळ प्रभाग नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागून राहिले आहे.












