- एकीकडे प्रस्ताव नसल्याचा दावा, तर दुसरीकडे २० जागांची मागणी आल्याचे विधान..
- महापालिका निवडणुकीआधीच संभ्रम वाढला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेस पक्षातूनच परस्परविरोधी भूमिका समोर आल्याने राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काँग्रेसकडून अधिकृत प्रस्ताव दिला नसल्याचे पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सांगत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मात्र काँग्रेसची २० जागांची मागणी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, काँग्रेसने आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत केवळ प्राथमिक स्वरूपात चर्चा केली आहे. या चर्चांमधून कोणताही अधिकृत किंवा अंतिम जागा वाटपाचा प्रस्ताव तयार झालेला नाही. तसेच अजित पवार गटासोबत निवडणूक लढविण्याबाबत काँग्रेसने कोणताही प्रस्ताव दिलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात आघाडीच्या चर्चेत अन्य पक्षांचा समावेश झाल्यास काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भूमिका घेईल, असे संकेतही त्यांनी दिले.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी काँग्रेसकडून २० जागांची मागणी करणारा अधिकृत प्रस्ताव प्राप्त झाल्याचा दावा केला आहे. या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील, असेही त्यांनी नमूद केले.
दोन्ही बाजूंनी केलेल्या परस्परविरोधी विधानांमुळे आघाडीतील समन्वयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महापालिका निवडणुकीत महायुती किंवा आघाडीचा अंतिम चेहरा काय असेल, हे चित्र उमेदवारी अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.












