- २६ डिसेंबर रोजी कीर्तन, महाप्रसाद, भक्तिगीत आणि मिरवणूक पार पडणार..
- भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; आयोजकांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
जामखेड प्रतिनिधी (दि. १९ डिसेंबर २०२५) :- दरवर्षी तिथीप्रमाणे साजरी होणारी श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी यंदा काही कारणास्तव तिथीनुसार बुधवार, दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी साजरी करण्यात आली. यानिमित्त श्री संत संताजी महाराजांच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक करण्यात आला. यावेळी भक्तांची मोठी रीघ दर्शनासाठी मंदिरात आली होती.
यावेळी सचिन जग्गनाथ क्षिरसागर, प्रशांत शिंदे, सचिन आतकरे, भास्कर काळे, शिवराम महाजन, छगन क्षिरसागर, जगन्नाथ केशव क्षिरसागर आदी भक्त परिवार उपस्थित होता.
दरम्यान पुण्यतिथी सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार, दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मेन पेठ येथून भव्य मिरवणूक निघणार असून ती श्री संत संताजी नगर, बीड रोड येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिरात समारोप होणार आहे.
त्यानंतर सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० या वेळेत ह.भ.प. पंढरीनाथ महाराज राजगुरू यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १.०० ते ४.०० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच श्री संताजी भक्त गायक राज प्रल्हाद रायते (बीड तेली समाज गायक, महाराष्ट्र राज्य) यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रमही होणार आहे.
या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून विजय भाऊ चौधरी (प्रदेशाध्यक्ष, तेली महासंघ महाराष्ट्र राज्य तथा प्रदेश महामंत्री, भाजपा महाराष्ट्र राज्य) आणि प्रविण लोखंडे (डी.वाय.एस.पी., कर्जत–जामखेड–श्रीगोंदा) उपस्थित राहणार आहेत. या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन तिळवंत तेली समाज जामखेड तालुका, श्री संताजी युवा प्रतिष्ठान जामखेड तालुका आणि प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.












