- कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण..
- “मी नेहमीच माझ्या जनतेसाठी समर्पित” – रुपालीताई साने…
अशोक लोखंडे :- संपादक व प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २० डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०१ (चिखली-मोरेवस्ती) मध्ये भाजपच्या महिला उमेदवार रुपालीताई पांडाभाऊ साने यांना भाजपचे ‘कमळ’ हे निवडणूक चिन्ह जवळपास निश्चित झाल्याने प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळत असून प्रचारालाही वेग आला आहे.
रुपालीताई साने यांनी प्रभागातील विविध भागांत नागरिकांची गाठ-भेट घेत आपुलकीचा संवाद साधला. घराघरांत जाऊन त्यांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी आतापर्यंत केलेल्या विकासकामांचा सविस्तर लेखाजोखा असणारे परिचय पत्रक नागरिकांना वाटप करण्यात आले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व बालकल्याण, तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत केलेल्या कामांची माहिती या पत्रकातून देण्यात आली.
“मी नेहमीच माझ्या जनतेसाठी समर्पित होते, आहे आणि यापुढेही जनता हीच माझ्यासाठी कायम सर्वप्रथम असेल,” असा शब्द रुपालीताईंनी प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला दिला. प्रचार दौऱ्यादरम्यान प्रभागातील तरुण, माता-भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिले. महिलांचा आणि युवकांचा मोठ्या प्रमाणावर मिळालेला प्रतिसाद हीच आपली खरी कमाई असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आपल्या कामावर आणि जनसंपर्कावर विश्वास व्यक्त करत “माझं प्रभागासाठी असलेलं काम लोकांना ठाऊक आहे. प्रभाग क्रमांक ०१ माझ्यासोबत आहे,” असा ठाम विश्वास रुपालीताई साने यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत प्रभाग ०१ मध्ये त्यांची उमेदवारी अधिक भक्कम होत असल्याचे चित्र आहे.












