- माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांचा भाजपला रामराम..
- अजित पवारांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादीत प्रवेश…
मा. अशोक लोखंडे – संपादक व पत्रकार
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ डिसेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट भाजपवर पलटवार करत भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला आहे. या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
शिवसेनेचे संजोग वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे पडसाद उमटले असून, याच पार्श्वभूमीवर संदीप वाघेरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपमधील अंतर्गत राजकारण, दुर्लक्षाची भावना आणि स्थानिक कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी संदीप वाघेरे यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत, “कार्यकर्त्यांचा सन्मान आणि निष्ठावंतांना न्याय देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस,” असा सूचक इशारा दिला आहे.
संदीप वाघेरे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक असून, त्यांच्या प्रवेशामुळे संबंधित प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, शहरातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आयारामांना पक्षात प्रवेश दिल्याने वेगळा निर्णय घ्यावा लागला. मी अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
– संदीप वाघेरे, माजी नगरसेवक भाजपा…












