- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रहाटणीत राजकीय हालचालींना वेग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ डिसेंबर २०२५) :- महापालिका निवडणुकीची तारीख जवळ येत असताना पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रत्येक प्रभागातील समीकरणे दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार सागर कोकणे यांनी आपण सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातूनच निवडणूक लढवणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
सागर कोकणे यांना राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा वडिलांकडून मिळालेला आहे. लहानपणापासूनच सामाजिक कार्याचे बाळकडू घेतलेले कोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रभागातील नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करत आहेत. दिवस-रात्र लोकांच्या संपर्कात राहून कार्य करण्याची त्यांची पद्धत मतदारांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत आहे.
त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद आणि संघटनात्मक काम करण्याची जिद्द यामुळे ते प्रभागातील सर्वात तरुण व आशादायी चेहऱ्यांपैकी एक मानले जात आहेत. नाना काटे यांचे विश्वासू म्हणूनही त्यांची प्रभागात ओळख असून, पक्षनिष्ठा आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
याच विश्वासावर सागर कोकणे यांनी प्रचारालाही आधीपासूनच सुरुवात केली असून, ते घराघरांत पोहोचत मतदारांशी संवाद साधत आहेत. सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून निवडणूक लढवून आगामी पंचवार्षिक काळात प्रभागात परिवर्तन घडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. रहाटणी प्रभागात त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.












