- निवडणूक प्रचार प्रमुखांकडून अधिकृत माहिती…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ डिसेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठींनी विधानसभानिहाय उमेदवारांचा आढावा घेतला असून, उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. २८) प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती पिंपरी चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी (दि. २६ ) दिली.
आमदार शंकर जगताप यावेळी म्हणाले, दोन दिवसात उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी आम्ही प्रदेश कार्यालयाकडे पाठविली आहे. मुंबईत या संदर्भात बैठक झाली. बैठकीला सर्व कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते.
उमेदवारांचा विधानसभानिहाय आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारी निश्चित आहे त्या नावांना अंतिम मान्यता देण्यात आली असली तरीही अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठींचाच असणार आहे. त्यानुसार प्रदेश आणि कोअर कमिटी याबाबत निर्णय घेईल.
उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची काळजी पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष मोठा होत असतो. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्ष न्याय देईलच असा मला विश्वास आहे. उमेदवारांची पहिली यादी रविवारी (दि. २८) प्रसिद्ध करण्यात येईल. पक्षाचा आदेश आल्यानंतर सर्वजण एक दिलाने, एक विचाराने काम करणार असून, पिंपरी चिंचवड महापालिकेत कमळ फुलविल्याशिवाय राहणार नाहीत.
– शंकर जगताप निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार, पिंपरी चिंचवड शहर…












