न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०६ जानेवारी २०२६):- कैवल्यसाम्राज्यचक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर जन्मोत्सव, श्री भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज व संत जनाबाई यांचा षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवनी समाधी सोहळा, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज देहूकर त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी प्रकटय वर्ष व संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा वर्ष या निमित्ताने महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यात वारकरी संप्रदयाचे वतीने भव्य स्वरुपात पारायण व कीर्तन सोहळे संपन्न होत आहेत. या सर्वांचे औचित्य साधत विश्ववंदनीय, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अनुग्रह दिनाच्या निमित्ताने होणारा माघ शुद्ध दशमी सोहळा या वर्षी भव्य-दिव्य स्वरुपात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला असणाऱ्या १०० एकरच्या भव्य पटांगणात वारकरी शिक्षण संस्थेचे अर्ध्यवू ,परमपूज्य हभप मारुतीबाबा कुऱ्हेकर महाराज यांच्या शुभ आशार्वादाने, वारकरीरत्न हभप छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वात सकल पुणे जिल्हा वारकरी संप्रदाय व श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट व माघ शुद्ध दशमी सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार, दि. २३ जानेवारी ते शनिवार, दि. ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. पहाटेचा काकडा आरती, श्रींचा अभिषेक, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण, दुपारच्या व रात्रीच्या सत्रात कीर्तन महोत्सव, संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र कथा, भारुड, संगीत भजन, जागर असे सांप्रदायिक कार्यक्रम होणार असून या कालावधीमध्ये दररोज दिवसभर लाखो भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव उर्फ बाळासाहेब काशिद यांनी दिली.
या भव्य-दिव्य सोहळ्यासाठी ४०० X २०० फुट आकाराचा आकर्षक असा मंडप उभारण्यात येणार असून ज्ञानेश्वरी व गाथा पारायणा साठी १०० X २०० फुट आकाराचे दोन स्वतंत्र मंडप, १०० X ३०० फुट आकाराचा महाप्रसादासाठी मंडप, ६० X ३०० फुट आकाराचे स्वयंपाक घर उभारण्यात येणार आहे. आज या मंडप उभारणीच्या कार्याचा शुभारंभ भंडारा पायथा येथे संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, माजी विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे, हभप शंकर महाराज मराठे, हभप रवींद्र महाराज ढोरे, नेवाळे मंडपचे मालक महादू नेवाळे यांचे शुभहस्ते एका खांबाची विधिवत पूजा करून संपन्न झाला. याप्रसंगी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे विश्वस्त, माघ शुद्ध दशमी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.












