- मद्यपींच्या तक्रारी येताच पिंपळे सौदागरमधील सेव्हन स्टार लेनची केली पाहणी..
- नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत केली जनजागृती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०९ जानेवारी २०२६) :- पिंपळे सौदागर येथील सेव्हन स्टार लेन परिसरात रस्त्यावर उघड्यावर मद्यपान केल्यामुळे महिला, मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची तत्काळ दखल घेत प्रभाग क्रमांक २८ (रहाटणी-पिंपळे सौदागर) मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवार सौ. अनिताताई काटे यांचे पती संदीप काटे यांनी संबंधित ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
सेव्हन स्टार लेन हा परिसर वर्दळीचा असून येथून दररोज मोठ्या प्रमाणावर महिला, शालेय व महाविद्यालयीन मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांची ये-जा असते. मात्र, काही समाजकंटकांकडून रस्त्यावर बसून मद्यपान केले जात असल्याने परिसरातील वातावरण बिघडत असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः संध्याकाळच्या वेळेत या प्रकारामुळे महिलांना व मुलींना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यावेळी संदीप काटे यांनी संबंधित मद्यविक्री करणाऱ्या दुकानदारांशी संवाद साधत, रस्त्यावर मद्यपान करणाऱ्यांना त्या ठिकाणी बसण्यास मनाई करण्याची विनंती केली. “पिंपळे सौदागर हा सुसंस्कृत व सुरक्षित परिसर म्हणून ओळखला जावा. रस्त्यावर मद्यपानामुळे येथील वातावरण खराब होत आहे. महिला व भगिनींच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच, परिसरातील नागरिकांनाही एकत्रितपणे अशा गैरप्रकारांना विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांनीही या वेळी समाधान व्यक्त करत तात्काळ हस्तक्षेप केल्याबद्दल संदीप काटे यांचे आभार मानले. भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन व पोलीस यांच्याशी समन्वय साधून ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
संपूर्ण प्रभाग व्यसनमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. युवक व तरुण व्यसनांच्या आहारी जाऊन आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. त्यांना वेळीच सावध करून, योग्य मार्गदर्शन देत स्वावलंबी व जबाबदार नागरिक घडवण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता पुढाकार घेणार. – संदीप काटे, सामाजिक कार्यकर्ते…











