- वाकडमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचाराचा धडाका..
- पक्षनेत्यांच्या दौऱ्यामुळे वातावरणनिर्मिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जानेवारी २०२५) :- वाकड ‘’भाजपचे धोरण नेहमीच विकास, सुशासन, पारदर्शकता आणि सर्वसामान्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारे राहिले आहे.त्याच धर्तीवर भाजप फक्त सत्तेसाठी नव्हे, तर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, हा विश्वास जनतेत अधिक दृढ झाल्याने यंदाही महापालिकेत बहुमताने भाजपाची सत्ता येणार,’’ असा ठाम विश्वास भाजपनेत्या तसेच दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी वाकड येथे व्यक्त केला.
प्रभाग क्र. २६ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार अॅड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे, व संदीप कस्पटे यांच्या प्रचारार्थ कस्पटे वस्ती येथे पार पडलेल्या कोपरा सभेत त्या बोलत होत्या. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विकासाची भूमिका स्पष्ट केली.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सक्षम, प्रामाणिक व विकासाभिमुख नेतृत्व हेच या निवडणुकीचे अधिष्ठान असल्याने ‘भाजप हर कदम विजय की ओर’ असे सर्वत्र चित्र असल्याचे नमूद केले.
‘वीकएंड’च्या मुहूर्तावर प्रभाग २६ मध्ये झंझावाती प्रचार..
शनिवार, रविवार असा ‘वीकएंड’चा मुहूर्त साधत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे व संदीप कस्पटे यांनी प्रभाग २६ मधील बहुतांश सोसायट्यांमध्ये बैठका घेतल्या. या बैठकांना सोसायाटीधारकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाबाबत काही सूचना देऊ केल्या.
सकाळी सात वाजल्यापासून प्रचारास सुरवात झाली. पिंपरी- चिंचवड शहरातील सर्वांत वेगाने विकसित झालेला परिसर म्हणून प्रभाग २६ (वाकड, कस्पटे वस्ती, जगताप डेअरी) ची ओळख आहे. जागतिक स्तरावर नावारूपास आलेल्या ‘हिंजवडी आयटी पार्क’मध्ये काम करणारा सर्वाधिक नोकरदार वर्ग निवासासाठी या परिसराला प्राधान्य देतो. त्यामुळे शेकडो सदनिकांचा समावेश असलेल्या विस्तीर्ण सोसायट्यांचे येथे जाळे विणले गेले आहे. त्या पार्श्वभूमीवरच आणि ‘विकएंड’चा मुहूर्त साधत उमेदवारांनी सोसायट्यांना ‘लक्ष्य’ केले. सोसायटीधारकांची थेट भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, त्यांच्यासमोर आपला विकासाचा ‘अजेंडा’ ठेवला.
निसर्ग क्लासिक, राधिका एन्क्लेव्ह, कास्प काउंट्री, निसर्ग एक- दोन, फ्लोरेंशिया, अनमोल रेसिडेन्सी, साई कॅलिस्टा, संस्कृती सोसायटी, कल्पतरू सोसायटी, ग्रीन व्हॅली, सोनिगरा लॉरेन, वेस्ट वूड, ऑस्टिन प्लाझा, विंडवार्ड्स सोसायटी, दक्षतानगर, निसर्गसृष्टी, महालक्ष्मी, विसलिंग पाम, निसर्गपूजा, सोनिगरा होम्स, वर्धमान रेसिडेन्सी, निसर्गदीप, नंदादीप, धनराज पार्क, ऐश्वर्या रेसिडेन्सी आदी सोसायट्यांमध्ये उमेदवारांच्या बैठका पार पडल्या. त्यामध्ये सोसायटीधारकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.












