- भाजपा उमेदवारांच्या प्रचाराला काळेवाडीत शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. ११ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ काळेवाडीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला जोर आला आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद जयवंत नढे यांनी “काळेवाडीमध्ये शिवस्मारक होणारच” असा ठाम निर्धार व्यक्त करत प्रचारात आघाडी घेतली आहे.
शनिवारी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हर्षद सुरेश नढे, कोमलताई सचिन काळे, नीता पाडळे यांच्यासह झालेल्या गाठीभेटी व प्रचारादरम्यान प्रभागातील शिवभक्त नागरिक तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नागरिकांशी थेट संवाद साधत विनोद नढे यांनी शिवस्मारकाच्या मागणीसाठी महापालिकेत ठोस पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिली.
सायंकाळी अजिंक्य मित्र मंडळ, नढे नगर येथे बाबासाहेब जगताप व मित्र परिवाराच्या वतीने प्रचार फेरीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर अजिंक्य कॉलनी, कांतीवीर कॉलनीसह इतर सहा सोसायट्यांमध्ये प्रचार करण्यात आला.
येत्या गुरुवारी कमळ चिन्हाला मतदान करून प्रभाग क्रमांक २२ मधील भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन विनोद नढे यांनी नागरिकांना केले.












