- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मान..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२७ फेब्रुवारी २०२६) :- कष्टकऱ्यांची उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेने माझा नागरी सन्मान करून प्रत्यक्षात सर्व कलावतांचा गौरव केला आहे. हा सन्मान केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून तमाशा आणि लोककलेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा सन्मान आहे. या गौरवामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून मला नव्या उर्जेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. आयुष्यभर ज्या कलेने मला ओळख दिली, त्या कलेच्या माध्यमातून मी पुढेही निष्ठापूर्वक लोकांची सेवा करत राहीन, असे प्रतिपादन ज्येष्ठ तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय भोसरी व हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय चिंचवड यांच्या सहकार्याने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे महाराष्ट्राची लोककला असलेल्या तमाशा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र, भक्ती शक्ती समुह शिल्प प्रतिकृती तसेच सन्मानचिन्ह देऊन नागरी सन्मान करण्यात आला, त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, माजी नगरसेवक मारुती भापकर, अरूण बोऱ्हाडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांच्यासह पद्मश्री रघुवीर खेडकर यांचे सहकारी शफी शेख तसेच महापालिका कर्मचारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना खेडकर म्हणाले, महाराष्ट्राने मला दिलेले प्रेम पाहून मी खरंच भारावून गेलो आहे. माझ्यासारखा साधा तमाशा कलावंत एवढ्या उंचीवर कसा पोहोचलो, हे मलाही कधी समजले नाही. तमाशा करताना अनेक वेळा मी विनामूल्य कार्यक्रम केले. काही वेळा तर पाण्याचीही अपेक्षा ठेवली नाही. तमाशामध्ये थोडे वेगळेपण आणावं म्हणून मी तीन वर्षं शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि ते तमाशात समाविष्ट केले जे नंतर लोकांना आवडू लागले. माझी जी कला आहे ती मी जुन्या कलावंतांकडूनच शिकलेलो आहे. त्यांच्या काळात जी पद्धत होती तीच मी पुढे नेली. आजच्या लोकांना ती नवीन वाटते, पण ती आपल्या परंपरेतीलच आहे. मला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मला खरंच धक्का बसला. सरकारने माझ्यासारख्या तमाशा कलावंताची दखल घेतली याचा आनंदही झाला आणि अभिमानही वाटला. मी कला जपत असताना सामाजिक कार्यातही हातभार लावण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी धडपड करत राहिलो. स्वतः छोट्या खोलीत राहिलो, पण माझ्या सहकाऱ्यांना पक्की घरे उभी करून दिली. माझ्या आईची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं, पण घरची परिस्थिती खूपच कठीण होती. त्यामुळे पाचवीत असतानाच शाळा सोडली आणि आईसोबत तमाशात काम सुरू केले.
तमाशातील माझी पहिली भूमिका मी अगदी लहान असताना केली. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांची आठवण झाली. मी अनेकदा त्यांच्या घरी जायचो. ते मला प्रेमाने खडीसाखर द्यायचे आणि म्हणायचे, “खडीसाखरेसारखा गोड राहा.” त्यांचा सहवास लाभला, हे माझं भाग्य आहे. तमाशा या कलेनेच मला आज इथपर्यंत आणलं आहे. जोपर्यंत माझ्यात शक्ती आहे, तोपर्यंत या रंगभूमीची सेवा करत राहणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेला हा सन्मान माझ्या उर्जेत आणखी भर घालणारा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महापौर रवि लांडगे म्हणाले, मराठी भाषा गौरव दिन आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जात आहे. साधुसंतांनी ज्या मराठी भाषेतून समाजप्रबोधन केले, अभंगांची निर्मिती केली, ती मराठी भाषा ही संघर्षातून समृद्ध झालेली भाषा आहे. नाणेघाट येथील शिलालेखांमध्ये मराठी भाषेचा उल्लेख आढळतो, यावरून या भाषेची प्राचीन परंपरा अधोरेखित होते. १२ व्या शतकात संतांनी सुरू केलेल्या भक्ती चळवळीमुळे मराठी भाषा अधिक प्रगल्भ झाली आणि समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरली. मराठी भाषेला प्राप्त झालेला अभिजात दर्जा हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. याच मराठी भाषेला घराघरात पोहोचविण्याचे कार्य ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांनी आपल्या तमाशाच्या माध्यमातून केले आहे. तमाशा या लोककलेतून त्यांनी केवळ मनोरंजनच केले नाही, तर समाजप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्यही घडवून आणले. ग्रामीण संस्कृती जपत त्यांनी ही कला देशासह परदेशात सादर करून मराठी भाषेचे नाव उंचावले आहे. त्यांच्या प्रभावी कलेच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले असून त्यांच्या या योगदानाची दखल शासनाने पद्मश्री पुरस्कार प्रदान करून घेतली आहे.
त्यांचे कार्य केवळ तमाशा या कलेपुरते मर्यादित नसून मराठी भाषा, संस्कृती आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. अशा महान लोककलावंताचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या कार्याचे जितके कौतुक करावे तेवढे कमीच आहे, असेही महापौर रवि लांडगे यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर हे आधुनिक लोककलेची गंगोत्री आहेत. महाराष्ट्राला लोककलेची फार मोठी परंपरा लाभली असून कीर्तन, कुस्ती आणि तमाशा यांसारख्या लोककलांनी समाजाला वेगळ्या प्रकारचे मनोरंजन दिले आहे. पूर्वी लोककला ही एका अर्थाने वर्तमानपत्राप्रमाणे काम करत होती. समाजात काय घडत आहे, हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणून लोककलेने महत्वाची भूमिका बजावली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अशा लोककलांच्या जतनाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांच्यासारख्या महान व्यक्तींमुळे आधुनिक काव्यपरंपरेला नवी दिशा मिळाली. मात्र संत पुन्हा होऊ शकत नाहीत, तसेच परंपरा जपणारे कलावंतही दुर्मिळ असतात. रघुवीर खेडकर म्हणजे महाराष्ट्र आणि लोककलेचे प्रतीक आहेत. तमाशा म्हटले की रघुवीर खेडकर यांचे नाव समोर येते. त्यांनी कधीही परंपरा सोडली नाही, उलट ती जपण्याचे आणि पुढे नेण्याचे काम केले आहे. हा सन्मान केवळ त्यांचा नसून आपल्या संपूर्ण शहराचा सन्मान आहे. आमचे भाग्य आहे की आम्हाला अशा महान कलावंताला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत आहे. पूर्वी लहानपणी तमाशामध्ये दोन दोन दिवस सवाल जवाब चालायचे. त्या परंपरेतून समाजात संस्कार रुजवण्याचे काम होत असे. ही संस्कारमूल्ये आजही जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रघुवीर खेडकर करत आहेत. समाजाला अशा महान कलावंतांची ओळख होणे आणि त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या, मराठी भाषा गौरव दिन हा आपल्या भाषिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करण्याचा दिवस आहे. संत परंपरेतून समृद्ध झालेल्या मराठी भाषेला लोककलेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांनी सातत्याने केले आहे. तमाशा या लोककलेतून त्यांनी समाजप्रबोधन घडवून आणत मराठी भाषा आणि ग्रामीण संस्कृती जपण्याचे काम केले आहे. अशा महान लोककलावंताचा सन्मान होणे ही आपल्या शहरासाठी अभिमानाची बाब असून त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन, मानपत्राचे वाचन विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. तर राजू मोहन यांनी पद्मश्री रघुवीर तुकाराम खेडकर यांचा परिचय सांगितला.












