- दुपारी दीड पर्यंत २८ टक्क्यांहून अधिक मतदान..
- दुपारनंतर मतदानाचा टक्का वधारण्याची शक्यता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १५ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज गुरुवारी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. शहरातील एकूण २०६७ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यास सुरुवात केली. निवडणूक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार सकाळी ७.३० ते १.३० या वेळेत एकूण २८.१५ टक्के मतदान झाले आहे.
या कालावधीत पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचा सहभाग तुलनेने कमी असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी ९.३० नंतर मतदानाचा वेग वाढत गेला असून सकाळी ७.३० ते १.३० या कालावधीत एकूण ४ लाख ८२ हजार ५३७ मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये २ लाख ७१ हजार २८२ पुरुष, २ लाख ११ हजार २४९ महिला आणि ६ इतर मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदानाची टक्केवारी २८.१५ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे.
शहरातील एकूण मतदार संख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी असून तीननंतर मतदानाचा टक्का आणखी वाढेल, असा अंदाज निवडणूक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरू असून पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क असल्याची माहिती देण्यात आली आहे.












