- गाथामूर्ती हभप ज्ञानेश्वर महाराज कदम (मोठे माऊली)…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. २९ जानेवारी २०२६) :- तुकाराम राम दो नाम | एक उनका सेतू भंग गया | एक का सेतू अभंग | या अभंग वचनानुसार प्रभू श्रीराम आणि तुकाराम हे एकाच परब्रम्हाचे दोन रूप असून प्रभू श्रीरामांनी बांधलेला सेतू काळाच्या ओघात भंग पावला परंतु तुकोबारायांनी जो भक्तीचा सेतू बांधला तो चंद्र-सूर्य असे पर्यत असेल, नव्हे नव्हे तर जोपर्यंत तुकोबांचे अभंग आहेत तोपर्यंत चंद्र-सूर्य राहील. आयोध्येतील प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर पाहण्याचे भाग्य आम्हांला लाभले त्याप्रमाणेच श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील तुकोबारायांचे हे भव्य मंदिर पूर्ण होवून पाहण्याचे भाग्य लवकरात लवकर आम्हाला लाभावे अशी शांतीब्रम्ह, गुरुवर्य मारोती महाराज कुऱ्हेकर बाबांसह वारकरी संप्रदायातील सर्वच जेष्ठ-श्रेष्ठ मान्यवरांची मनोभावना आहे, असे प्रतिपादन गाथामूर्ती हभप ज्ञानेश्वर महाराज कदम तथा मोठे माऊली महाराज कदम यांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे केले.
संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा, संत सावता माळी ६३० वी जयंती व तपोनिघी नारायण महाराज त्रिशतकोत्तर प्रकाट्या वर्षानिमित्ताने वारकरी रत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वात श्रीक्षेत्र भंडार डोंगर ट्रस्टने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला आयोजित केलेल्या ‘अखंड हरीनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण व कीर्तन महोत्सव’ या सोहळ्यात जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या अनुग्रह दिनी, माघ शुद्ध दशमीच्या पवित्र तिथीच्या दिवसाची कीर्तनसेवा मोठे माऊली महाराज कदम यांनी केली.
माघ शुद्ध दशमी हा विश्ववंदनीय, जगदगुरू संत तुकोबारायांचा अनुग्रह दिन, साक्षात्कार दिन. तुकोबाराय गंगा स्नानाला जात असताना वाटेत सदगुरुरायांनी त्यांना गाठले, मस्तकी हात ठेवत भोजनासाठी पावशेर तुप मागितले. सदगुरुरायांनी राघवचैतन्य, केशवचैतन्य ही गुरुपरंपरा सांगत स्वतःचे नाव बाबाजी सांगत संत तुकोबारायांना ‘रामकृष्ण हरी’ हा सोपा मंत्र दिला. गुरूंचा अनुग्रह, साक्षात्कार झाला तो दिवस म्हणजे माघ शुद्ध दशमी. शके १५५४ (इ.स.१६६२) वारकरी संप्रदायात या माघ शुद्ध दशमीला अनन्य साधारण असे महत्त्व असून एक मोठी परंपरा आहे.
सत्य गुरुरायें कृपा मज केली | परि नाहीं घडलीं सेवा कांहीं ||
बाबाजी आपुले सांगितलें नाम | मंत्र दिला रामकृष्ण हरि ||
माघ शुद्ध दशमीच्या तिथीला अनुसरून या प्रासंगिक अभंगावर मोठे माऊली महाराज कदम यांनी आपल्या रसाळ वाणीतून निरुपण करीत सांगितले की खडतर साधने शिवाय गुरूंची कृपा होत नाही. माघ शुद्ध दशमी या तिथीला तुकोबारायांना गुरूंची कृपा झाली. जन्मा आलो त्याचे | आजि फल जाले साचे || या अभंग वचनाप्रमाणे तुकोबाराय उद्धाराच्या मार्गाला लागले आणि तुकोबारायांनी आपल्या जीवनाच्या उत्तर आयुष्यात सर्वसामान्य जीवांचा उद्धार व्हावा याकरीता अनेक उपदेश करीत भक्ती मार्गाची दिशा दिली. जिये मार्गी संत चालती | त्या मार्गाची लागो मज माती | याप्रमाणे संताच्या मार्गाने गेलो तरच आपणां सर्वांवर कृपा होईल. श्रीक्षेत्र भंडारा डोंगराची ही भूमी अत्यंत पवित्र असून येथे येणारा प्रत्येक भाविक ही माती आपल्या कपाळी लावतो अशी सर्व वारकरी भाविकांची श्रद्धा आहे असे कदम महाराजांनी सांगितले.
माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने सकाळी सहा वाजता मावळ तालुक्याचे तहसीलदार श्री व सौ. देशमुख साहेब यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल-रुखमाई व जगद्गुरु तुकोबारायांच्या मूर्तींची विधिवत पूजा करून अभिषेक झाला. दुपारी युवा कीर्तनकार हभप सचिन महाराज पवार यांची कीर्तन सेवा संपन्न झाली. दुपारी 3 वाजता वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या रसाळ, सुमधूर वाणीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर कथा झाली.
काल सकाळी ९ नंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मित दुखद निधनाची बातमी आल्यानंतर दुपार पर्यंत भाविकांची गर्दी कमी होती. परंतु दुपारी २ नंतर मात्र तुकोबारायांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर गर्दी केली होती. रात्रीचे कीर्तन व दशमीच्या महाप्रसादासाठी पायथ्याला रात्री उशिरापर्यत भाविकांची सर्व मंडपात अलोट गर्दी होती. या संपूर्ण सप्ताहात सुदुंबरे येथील श्री. महेंद्र होनावळे हे महाप्रसाद तयार करण्याचे कार्य करीत असून पुणे जिल्हयातील अनेक गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भाकरी पोहचवित आहेत. श्रीक्षेत्र आळंदी येथील स्वकाम सेवा मंडळ, मावळातील खांडी, बोरवली, ठाकरवाडी येथील सुमारे २०० स्वयंसेवक पंगतीतून महाप्रसाद वाटपाचे काम करीत आहेत.
श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनचे अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल व खालुंब्रे येथील युवा उद्योजक गणेश बोत्रे यांनी श्रीक्षेत्र भंडारा पायथा ते मंदिरापर्यंत भाविकांसाठी दिवसभर मोफत बस सेवा ठेवली होती.

















