न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२६) :- उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत व विकासात मोलाचे योगदान आहे. त्यांच्या या योगदानाचा सन्मान राखत, तसेच त्यांना श्रद्धांजली म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौरपद देऊन मोठेपण दाखवावे, अशी अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वृक्षमित्र (महाराष्ट्र शासन) तथा मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी व्यक्त केली आहे.
अरुण पवार म्हणाले, की सध्या राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत असून, स्व. अजित पवार हे महायुतीतील अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी नेते होते. राज्याच्या राजकारणासोबतच विकास प्रक्रियेत त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या विकासकामांमध्ये अजित पवार यांची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते.
अरुण पवार पुढे म्हणाले की, राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र विकासासाठी काम करणाऱ्या नेत्याचा सन्मान हा सर्वपक्षीय असायला हवा. स्व. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी दिलेले योगदान लक्षात घेता, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसला महापौरपद देणे हा एक सकारात्मक आणि समन्वयाचा संदेश देणारा निर्णय ठरेल.
असा निर्णय घेतल्यास महायुती सरकारकडून राजकीय परिपक्वता, सलोखा आणि विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका अधोरेखित होईल, तसेच राज्यातील नागरिकांमध्येही सकारात्मक संदेश जाईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
–

















