न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ जानेवारी २०२६) :- “आपली जन्मभूमी बारामती असली तरी माझी कर्मभूमी पिंपरी-चिंचवड आहे,” असे निक्षून सांगणारे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पुत्रवत प्रेम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली झालेले अपघाती निधन मनाला चटका लावून जाणारे आहे,” अशी भावना आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ते खरे ‘दादा’ होते असेही आमदार जगताप पुढे म्हणाले.
आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, “अजित पवार हे केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर चणाक्ष राजकारणी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि प्रशासकीय कारभाराचा दांडगा अनुभव असलेले कर्तबगार नेतृत्व होते. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्या मधून जाणे हे केवळ पिंपरी-चिंचवडसाठी नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रासाठी मोठी पोकळी निर्माण करणारे आहे.”
१९९२ ते आजतगायत् सातत्याने या शहराबरोबर अजितदादांचा स्नेह जोडलेला होता. “पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीचे, प्रगतीचे आणि विकासाच्या वाटचालीचे ते खरे शिल्पकार होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमचे वडीलबंधू दिवंगत लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत तब्बल तीस वर्षे शहरासाठी काम केले. शहराचा कायापालट करण्यासाठी झपाटून काम करणारी ही दोन व्यक्तिमत्त्वे होती. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी व्यथित करणारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
आमदार जगताप पुढे म्हणाले, “अजित दादांसारखे धडाडीचे, निर्णयक्षम आणि झपाटून काम करणारे नेतृत्व पुन्हा तयार होण्यासाठी मोठा कालावधी लागतो. असा नेता पुन्हा होणे शक्य नाही . या शहरातील प्रत्येक कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी यांचा अजित दादांशी स्नेह होता, ऋणानुबंध होते. राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन काम करणारे ते व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही,” असेही त्यांनी भावुक शब्दांत सांगितले.
















