- पुणे व पिंपरी-चिंचवडच्या विकासात अजितदादांचे मोठे योगदान..
- शिवसेने (उद्धव ठाकरे) कडून अजित पवारांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२६) :- पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या औद्योगिक, नागरी आणि पायाभूत विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी सातत्याने प्रयत्न केले. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, वाहतूक सुधारणा, औद्योगिक गुंतवणूक आणि नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी घेतलेले निर्णय आजही विकासाच्या टप्प्यांवर दिसून येतात. त्यामुळेच शहराच्या प्रगतीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. अजित दादांसारखा विकासपुरुष पुन्हा होणे नाही, असं मतं शिवसेना (उद्धव ठाकरे) पिंपरी विधानसभा शिवसेना समन्वयक विजय गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात गुप्ता यांनी म्हटले की, ”राज्याच्या राजकारणात ठसा उमटवणारे आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या कार्याची सर्वत्र आठवण काढली जात आहे. “अजितदादा हे काम करणारे आणि निर्णयक्षम नेते होते. त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे जाणे ही केवळ राजकीय नव्हे तर राज्याच्या विकासासाठी मोठी हानी आहे.”
विकासाभिमुख नेतृत्व, प्रशासनावर पकड आणि काम पूर्णत्वास नेण्याची क्षमता यामुळे अजितदादा पवार यांचे नाव महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त करत विजय गुप्ता यांनी अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

















