मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या नव्या रचनेत भाजपचे वर्चस्व कायम राहिले असून समितीत भाजपचे ११, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आणि शिवसेनेचा १ सदस्य असा पक्षनिहाय समावेश होणार आहे. नगरसेवकांच्या संख्येनुसार ही रचना निश्चित करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पालिकेतील महत्त्वाच्या समित्यांवरही पक्षाचे वर्चस्व दिसून येत आहे. स्थायी समिती ही पालिकेच्या आर्थिक निर्णयांसाठी महत्त्वाची मानली जाते. शहरातील विकासकामांना अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार या समितीकडे असतात. त्यामुळे सर्वच पक्षांकडून या समितीत प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी प्रयत्न होत होते.
दरम्यान, महापालिकेत महापौर निवडीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. प्रशासनाने महापौर निवडीसाठी आवश्यक तयारी सुरू करत सभागृह आणि संबंधित कार्यालयांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.
महापौर पदाच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया निश्चित वेळेत पार पडणार आहे. अर्ज स्वीकृतीसाठी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत नगर सचिव विभागात व्यवस्था करण्यात येणार आहे.
गटनेत्यांची नोंदणी, सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांची घोषणा आणि समित्यांची रचना यानंतर महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निवडीनंतर शहराला नवीन महापौर मिळणार असून त्यानंतर पुढील प्रशासकीय कामकाजाला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्थायी समितीसह विविध विषय समित्यांमध्येही पक्षनिहाय सदस्यांची नियुक्ती होणार असून त्यातून पुढील काळात शहरातील विकासकामांवर निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस पालिका राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.












