- संत नामदेव महाराजांचे वंशज हभप केशव महाराज नामदास…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. ३० जानेवारी २०२६) :- विश्ववंदनीय, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर निर्माणाचे कार्य श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर सुरु आहे. आजपर्यत बरेच काम झाले असून अजून थोडे काम बाकी आहे. तुकोबारायांच्या कार्याला साजेशे हे मंदिर होत आहे याचा आपणा सर्वानाच आनंद आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे | उदास विचारे वेच करी || या तुकोबारायांच्या अभंग वाचनाला अनुसरून या मंदिर बांधकामासाठी ज्यांनी- ज्यांनी हातभार लावला ते सर्वजण भाग्यवान आहेत असे प्रतिपादन श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री संत नामदेव महाराजांचे वंशज हभप श्रीगुरू केशव महाराज नामदास यांनी केले.
संत ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती, संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा, संत नामदेव महाराज व संत जनाबाई षष्ठशतकोत्तर अमृत महोत्सवी संजीवन समाधी सोहळा, संत सावता माळी ६३० वी जयंती व तपोनिघी नारायण महाराज त्रिशतकोत्तर प्रकाट्य वर्षानिमित्ताने वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या नेतृत्वात श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टने श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथ्याला आयोजित केलेल्या अखंड हरीनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी व गाथा पारायण व कीर्तन महोत्सव या सोहळ्यात सातव्या दिवसाची कीर्तनसेवा हभप श्रीगुरू केशव महाराज नामदास यांनी केली.
धन्य धन्य नामदेव | सर्व वैष्णवांचा राव | | प्रत्यक्ष दाविली प्रचीत | वाळुवंटी परीस सत्य | |
शांतीब्रम्ह श्री संत एकनाथ महाराजांनी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा महिमा वर्णन केलेल्या या अभंगावर हभप श्रीगुरू केशव महाराज नामदास यांनी कीर्तनसेवेतून निरुपण करीत सांगितले की प्रत्यक्ष विठ्ठलाचा दास असलेले नामदेवराया हे विठोबाचे फारच लाडके भक्त होते. संत नामदेव महाराजांनी प्रगल्भ कवित्वतेने सर्व जनास तारले. अत्यंत निराभिमानी आणि अंत:करणाने निर्मळ असलेल्या नामदेवांनी सर्व मानव जातीला नामाचा महिमा सांगितला. विठ्ठल नामस्मरणावाचून ते काहीच जाणत न्हवते आणि म्हणुनच त्यांचे प्रेम पांडुरंगाला प्रिय होते.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे रजकण या भंडारा डोंगराच्या मातीला लागल्या कारणाने या भंडारा डोंगराच्या मातीचा प्रभाव आगळा वेगळा आहे. महाराजांची ही चिंतन भूमी, अध्यात्मिक भूमी असून तुकोबारायांनी भंडारा डोंगरासह भामचंद्र व घोरावडेश्वर या तीन ही डोंगरावर चिंतन करीत मोठी तपश्चर्या केली. महाराज कोणत्या डोंगरावर जाणार हे आई जिजाईना कधीच सांगत नसत. थोर पतिव्रता असणाऱ्या जिजाई देखील महाराजांनी जेवण केल्या शिवाय अन्नाचा कण देखील घेत नसत. मुलाबाळांचे जेवण उरकून जिजाई महाराजांचा शोध घेत निघत व वाटेवरील मातीला कान लावून ज्या दिशेने विठ्ठल-विठ्ठल असा आवाज येई त्या डोंगरावर महाराजांची न्याहारी घेऊन जात व महाराजांनी भोजन केल्यानंतरच भोजन करीत असत असा हा भंडारा डोंगराचा महिमा नामदास महाराजांनी आपल्या कीर्तनसेवेतून सांगितला.
पहाटेचा काकडा, श्री विठ्ठल-रुखमाई व जगद्गुरु तुकोबारायांच्या मूर्तींची विधिवत पूजा करून अभिषेक झाल्यानंतर सकाळच्या सत्रात दोन स्वतंत्र मंडपामध्ये श्री ज्ञानेश्वरी व गाथा पारायण झाले. सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत मुळशी तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने युवा कीर्तनकार हभप संतोष महाराज पायगुडे यांची कीर्तन सेवा झाली. नंतर हरिपाठ होऊन दुपारी 3.30 वाजता वारकरीरत्न छोटे माऊली महाराज कदम यांच्या रसाळ, सुमधूर वाणीतून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवन चरित्रावर कथा झाली.












