- क्रीडा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भाडे व अनामत रकमेच्या वसुलीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे समोर आले असून सुमारे ५१ लाख रुपयांच्या अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे महापालिकेच्या आर्थिक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रेक्षागृह भाड्याने देताना अनामत रक्कम घेणे, भाडे वसूल करणे आणि कार्यक्रमांची नोंद ठेवणे या प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. अनेक कार्यक्रम झाले असतानाही त्यांची नोंद अधिकृत रजिस्टरमध्ये नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक तपासानुसार संबंधित कालावधीत मोठ्या संख्येने कार्यक्रम पार पडले, मात्र कार्यालयीन नोंदींमध्ये त्यापैकी फारच कमी कार्यक्रम दाखवण्यात आले. त्यामुळे महापालिकेला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात क्रीडा विभागातील सुमारे १५ कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तपास अहवाल पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, प्रेक्षागृह भाडे प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि भविष्यात अशा प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी प्रशासनाने नवीन नियंत्रण यंत्रणा उभारण्याची तयारी सुरू केल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.












