- हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
सुरज करांडे, क्राईम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जानेवारी २०२६) :- प्लॉट विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी परिसरात उघडकीस आला असून याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने मुळशी तालुक्यातील मौजे माण येथील मल्हार पार्क परिसरातील प्लॉट विक्रीस देण्याचे आश्वासन फिर्यादी ओंकार अशोक आष्टेकर (वय ३५, व्यवसाय – ज्वेलरी, रा. कोथरूड) यांना दिले होते. या व्यवहारासाठी आरोपीने फिर्यादींकडून बँक व्यवहाराद्वारे ४ लाख ५३ हजार रुपये तसेच रोख स्वरूपात २७ लाख ४७ हजार रुपये, अशी एकूण सुमारे ३२ लाख रुपयांची रक्कम घेतली.
यानंतर जानेवारी २०२३ मध्ये १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ताबा साठेखत करून देण्यात आले. तसेच व्यवहार पूर्ण न झाल्यास परतफेडीच्या हमी म्हणून आरोपीकडून एकूण ३७ लाख रुपयांचे दोन पोस्ट डेटेड धनादेश देण्यात आले. मात्र हे धनादेश बाऊन्स झाले.
तसेच संबंधित प्लॉटचा ताबा किंवा खरेदीखतही देण्यात आले नाही आणि घेतलेली रक्कमही परत करण्यात आली नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यामुळे आर्थिक फसवणूक व विश्वासघात झाल्याचे स्पष्ट होत असून या प्रकरणी २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.












