- स्पाईन रोडवरील नगरसेवक बापू घोलप यांच्या कार्यालयाजवळील घटना…
सुरज करांडे, क्राईम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जानेवारी २०२६) :-निगडी परिसरातील स्पाईन रोडवर भरधाव आणि निष्काळजीपणे चालविलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित दुचाकी चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास चिकन चौक ते त्रिवेणीनगर चौक मार्गावर नगरसेवक बापू घोलप यांच्या कार्यालयाजवळ ही घटना घडली. फिर्यादी सचिन मारुती पवार यांचे वडील मारुती धोंडीबा पवार (वय ७०) हे स्पाईन रोडवरून पायी जात असताना भक्ती शक्ती चौकाकडून येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. ही दुचाकी भरधाव वेगात आणि वाहतुकीचे नियम न पाळता चालविल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप असून या धडकेत मारुती पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दुचाकी चालक राजू दहिहंडे (वय ३५, रा. चिंचवड) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करत आहेत.











