- गटनेतेपद अजूनही रिक्तच; दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येणार का?..
- राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण ३७ नगरसेवक निवडून आले असून, पक्षाची शहरातील राजकीय ताकद कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय महापालिकेत पक्षाकडून तीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असून त्यानंतर पक्षाचे संख्याबळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एक खासदार आणि एक आमदार असल्याने पक्ष मजबूत स्थितीत आहे.
दरम्यान, महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदाची निवड अद्याप झालेली नसल्याने पक्षातील पुढील राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. विरोधी पक्षनेतेपदही याच निवडीवर अवलंबून असल्याने या पदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्थायी समितीत १६ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा मिळण्याची शक्यता असून, तसेच शिक्षण, विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, क्रीडा आदी विषय समित्यांमध्ये प्रत्येकी दोन सदस्यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे विविध समित्यांमध्ये पक्षाची भूमिका प्रभावी राहणार आहे.
महापालिका निवडणुकीदरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी एकत्र प्रचार केल्याचे दिसून आले होते. अजित पवार, युवा नेते रोहित पवार तसेच खासदार अमोल कोल्हे यांनी शहरात एकत्रित सभा घेत प्रचारात सहभाग नोंदवला होता. त्यामुळे आगामी काळात दोन्ही गट कायमस्वरूपी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरातील राजकीय परिस्थितीत सध्या अजित पवार यांच्या अनुपस्थितीमुळे नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याची चर्चा सुरू असून, भविष्यात स्थानिक पातळीवर नेतृत्व कोणाकडे राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत गटनेते निवड आणि समित्यांची रचना स्पष्ट झाल्यानंतर पालिका राजकारणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.












