- राष्ट्रवादीचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय?..
- पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा बिनविरोध महापौर होण्याचा मार्ग मोकळा?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०२ फेब्रुवारी २०२६) :- उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणावर शोककळेची छाया पसरली आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचा आणि राजकीय संकेत देणारा निर्णय घेत महापौर पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ आज दुपारी ३ ते ५ अशी निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीत एकच अर्ज आल्यास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकामध्ये बिनविरोध महापौराची घोषणा होईल.
खरं तर अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाला थेट आव्हान देत राजकीय रणशिंग फुंकले होते. आज ते हयात असते तर, महापौर निवडणूक ही केवळ औपचारिक प्रक्रिया न राहता, सत्ताधाऱ्यांसाठी देखील प्रतिष्ठेची लढाई ठरू शकली असती. मात्र निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर झालेल्या त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राजकीय गणितच बदलून गेले.
या दुःखद घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून संवेदनशील भूमिका घेत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा निर्णय केवळ राजकीय नसून भावनिक आणि नैतिक पातळीवर घेतल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता भाजपकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल करणारा उमेदवार बिनविरोध निवडून येणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, राष्ट्रवादीचा हा निर्णय भविष्यातील राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरू शकतो. एका बाजूला अजित पवारांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले आव्हान, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या निधनानंतर दाखवलेली संयमित भूमिका या दोन्ही बाबी पिंपरी-चिंचवडच्या राजकीय इतिहासात वेगळ्या संदर्भाने नोंदवल्या जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.












