- पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप नगरसेवकांच्या गटाची नोंदणी
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३१ जानेवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी श्री. प्रशांत शितोळे यांची अधिकृत निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी शनिवारी (दि. ३१) दिली.
दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पुणे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली आहे.
याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवले. शहरामध्ये भाजपच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात अनेक सुविधा निर्माण झाल्या. नागरिकांना अत्याधुनिक मेट्रो सुविधेपासून चांगले रस्ते, पाणी व्यवस्थापन, करप्रणालीत सुसूत्रता, कचऱ्याचे नियोजन, सक्षम आरोग्य योजना अशा सर्वंकष विकासावर ‘फोकस’ ठेवला. यामुळे नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीमध्ये नागरिकांनी भाजपला भरभरून प्रतिसाद दिला. शहरवासीयांनी भाजपाला एक हाती कौल दिलेला आहे. नागरिकांचा हा विश्वास भाजप सार्थ केल्याशिवाय राहणार नाही. आगामी काळात नागरिकांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच सुरक्षित, पर्यावरण पूरक शहराची अनुभूती देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याच माध्यमातून आज अनुभवी प्रशांत शितोळे यांना गटनेता म्हणून निवड केलेली आहे.
पालिकेच्या माध्यमातून केली जाणारी कामे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीत कोणातूनच केली जातील. यासाठी प्रशांत शितोळे यांच्या अनुभवाचा नक्कीच सर्वच नगरसेवकांना फायदा होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या विचाराने ते काम करतील असा विश्वास सर्वांनाच आहे. श्री. प्रशांत शितोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप नगरसेवक सकारात्मक आणि परिणामकारक कामकाजावर लक्ष केंद्रित करतील. नगर विकास, नागरिक सेवा आणि शहराच्या प्रगतीसाठी भाजप सदैव सक्रिय राहणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.











