- या कालावधीत परिसरातील काही मार्ग बंद..
- असे आहेत पर्यायी मार्ग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ९ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमुळे इंद्रायणीनगर परिसरात तात्पुरते वाहतूक बदल करण्यात आले आहेत. उमेदवारांच्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचण्या संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर (भोसरी) येथे ११ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी व वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार, चिखली वाहतूक विभागाच्या हद्दीत भोसरी इंद्रायणीनगर येथील महादेव मंदिर ते श्री स्वामी समर्थ सीबीएसई स्कूल गेट क्रमांक २ या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. हा आदेश १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून २६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. मात्र पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्गही जाहीर करण्यात आले आहेत. भोसरी तिरुपती (सहारा) चौकाकडून संत ज्ञानेश्वर क्रीडांगण मार्गे इंद्रायणीनगर स्वीट कॉर्नर चौकाकडे जाणारी वाहतूक श्री समर्थ सीबीएसई स्कूल गेट क्रमांक २ येथे उजवीकडे वळून इंद्रायणीनगर पोलीस वसाहत, मिनी मार्केट मार्गे रामकृष्ण मोरे प्रवेशद्वारातून पुढे जाईल. तसेच स्वीट कॉर्नर चौकाकडून तिरुपती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी महादेव मंदिराजवळून डावीकडे वळून रामकृष्ण मोरे प्रवेशद्वार, मिनी मार्केट मार्गे इच्छित स्थळी जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत जाहीर करण्यात आलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.












