- तातडीने बारामतीहून पुण्यात हलवले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ९ फेब्रुवारी २०२६) :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. बारामती येथील गोविंद बाग येथून त्यांना खासगी वाहनातून पुण्याकडे हलवण्यात आले असून रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना कफाचा त्रास वाढला असून श्वास घेण्यासही काही प्रमाणात अडचण निर्माण झाली होती. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने पुण्यात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी खासदार सुप्रिया सुळे तसेच त्यांचे पती सदानंद सुळे हेही त्यांच्यासोबत उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे विशेष लक्ष असून आवश्यक वैद्यकीय तपासण्या सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
वृत्तसंस्था एएनआयने या संदर्भातील प्राथमिक माहिती दिली असून शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी अधिकृत वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना कार्यकर्ते व समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.












