- तात्काळ फवारणी व स्वच्छता मोहिम राबवण्याची विवेक तापकीर यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक २७ मधील तापकीरनगर, श्रीनगर व रहाटणी परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर साई मल्हार सोशल फाऊंडेशनचे सचिव विवेक मल्हारी तापकीर यांनी महानगरपालिकेकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मच्छरांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात साचलेले पाणी, नाल्यांची अपुरी साफसफाई व कचऱ्याचा साठा यामुळे मच्छरांची पैदास वाढत असल्याचे तापकीर यांनी नमूद केले.
औषध फवारणी, धूर फवारणी, साचलेल्या पाण्याचे निर्मूलन, नियमित स्वच्छता मोहीम तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.












