- पाण्याच्या टाकीसाठी वृक्षतोड नको..
- पर्यायी जागेचा विचार करा, आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ नोव्हेंबर २०२६) :- निगडी सेक्टर क्रमांक २३ येथील दुर्गादेवी उद्यान टेकडीवर पाण्याची टाकी उभारण्यासाठी तब्बल २२७ झाडे तोडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका सौ. शैलजा अविनाश मोरे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. वृक्षतोडीला परवानगी देऊ नये आणि पाण्याच्या टाकीसाठी पर्यायी जागेची निवड करावी, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुर्गादेवी उद्यान टेकडी ही शहरातील महत्त्वाची नैसर्गिक हरित जागा असून, परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने तिचे विशेष महत्त्व आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी अनेक नागरिक येथे व्यायाम, फिरणे आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. अशा ठिकाणची २२७ झाडे तोडल्यास पर्यावरणाचा समतोल, जैवविविधता आणि नैसर्गिक हिरवळीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
शहरातील वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि घटणारी वृक्षसंपदा लक्षात घेता अस्तित्वातील झाडांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. एकीकडे महापालिका वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे नैसर्गिक ऑक्सिजन पार्कमधील शेकडो झाडांची कत्तल करणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
पाण्याची टाकी उभारणे आवश्यक असल्यास वृक्षसंपदेचे नुकसान टाळणाऱ्या पर्यायी जागेची पाहणी करावी. तसेच प्रकल्पाची सविस्तर माहिती, वृक्षतोडीची आवश्यकता आणि संबंधित मंजुरीची कागदपत्रे सार्वजनिक करावीत. स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी संस्थांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दुर्गादेवी उद्यान टेकडीचे नैसर्गिक स्वरूप कायम राखून २२७ झाडांच्या वृक्षतोडीचा प्रस्ताव तातडीने थांबवावा, असे आवाहन शैलजा मोरे यांनी आयुक्तांना केले आहे.













![[PCMC] भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा रखडली!](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/images-1-2-190x122.jpeg)



