न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २६ नोहेंबर २०२६) :- पीएमपीएमएल डेपोमध्ये कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच कर्मचाऱ्याचा मोबाईल फोन जमिनीवर आपटून फोडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय अनिल देशपांडे (वय ३९, रा. नारायण हट सोसायटी, भोसरी) हे पीएमपीएमएल डेपो येथे सुरक्षा कर्मचारी म्हणून काम करतात. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास संत तुकारामनगर आगार, नेहरूनगर येथील पीएमपीएमएल डेपोमध्ये हा प्रकार घडला.
याप्रकरणी सोनाली विनोद वाघमारे (वय ३६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलेने डेपोच्या गेटमधून आत प्रवेश करून सुरक्षा केबिनमध्ये जात वाहनांच्या आवक-जावक नोंदी सुरू असताना फिर्यादी यांच्या हातातील रजिस्टर ओढून घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. पत्नीला फोन लावण्यास सांगून फोन लावत असताना फिर्यादींचा मोबाईल हिसकावून जमिनीवर आपटून फोडला.
तसेच, ‘मी क्राईम रिपोर्टर आहे, मला आताच्या आता ५० हजार रुपये दे,’ अशी मागणी करून खंडणी मागितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याशिवाय, ‘तू इथे कशी ड्युटी करतो, ते मी बघते,’ अशी धमकी देत फिर्यादींच्या गालावर हाताने मारहाण करून त्यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३२ वाजता भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















