न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २६ नोव्हेंबर २०२६) :- के.एम.जे.पी. एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल, रहाटणी येथे ७७ वा भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.
संविधान दिनानिमित्त शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, विमल गार्डन व कोकणे चौक या मार्गावरून संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी संविधानविषयक घोषणा देत नागरिकांमध्ये संविधानाबाबत जनजागृती केली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्या मॅडम यांच्या सूत्रसंचालनाने झाली. यावेळी डिंपल मॅडम यांनी इंग्रजी भाषेतून शिक्षक व विद्यार्थ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या. निशा मॅडम यांनी मराठी भाषेतून संविधानातील मूल्ये दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले, तर कल्पना मॅडम यांनी हिंदी भाषेतून संविधानिक मूल्यांचे महत्त्व विशद केले.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार सर यांनी आपल्या मनोगतात न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता व एकात्मता या संविधानिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी निबंध व चित्रकला स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. तसेच २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप समीक्षा मॅडम यांनी आभार प्रदर्शनाने केला. संविधानिक मूल्यांची जपणूक, सामाजिक एकता, राष्ट्रीय एकात्मता आणि लोकशाहीप्रती आदरभाव निर्माण करण्याचा प्रेरणादायी संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

















