- एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या तपासाला यश; विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २६ नोहेंबर २०२६) :- अल्पवयीन पीडित मुलीवरील विनयभंग प्रकरणात आरोपीला पिंपरी-चिंचवड जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिनेश बाबुराम चौधरी (वय २८) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक २४९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७५(१) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) कलम ८, १० व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. ८ एप्रिल २०२६ रोजी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनीषा दशवंत यांनी अवघ्या ३० दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. खटल्याची जलदगतीने सुनावणी घेण्याची विनंती अभियोग पक्षाने न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार विशेष न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून दि. २१ नोव्हेंबर २०२६ रोजी निकाल दिला.
न्यायालयाने आरोपीला दोन वर्षांचा कारावास व दोन हजार रुपये दंड, पोक्सो कायद्याच्या कलम ८ अन्वये तीन वर्षांचा कारावास व दोन हजार रुपये दंड, कलम १० अन्वये पाच वर्षांचा कारावास व दोन हजार रुपये दंड, तर कलम १२ अन्वये दोन वर्षांचा कारावास व दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सर्व शिक्षा एकत्रितपणे भोगावयाच्या आहेत.
या खटल्यात विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. स्मिता चौगुले यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. तर कोर्ट पैरवी अधिकारी महिला पोलीस हवालदार संगीता सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात समन्वय साधला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त मारुती जगताप, सहायक पोलीस आयुक्त सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

















