- नावे जाहीर होऊनही अर्ज दाखल नाहीत..
- महिनाभराची मुदत मागितल्याची चर्चा..
- १५ डिसेंबरच्या सभेकडे लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ नोव्हेंबर २०२६) :- : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा तिढा अद्याप कायम आहे. तब्बल साडेआठ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सत्ताधारी भाजपने सात स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली. मात्र, नावांची घोषणा होऊनही संबंधितांनी आयुक्तांकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल केले नसल्याने निवड प्रक्रिया पुन्हा रखडली आहे.
महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची घोषणा केली. यामध्ये सचिन साठे, जयनाथ काटे, विशाल कलाटे, कुणाल लांडगे, राजेश पिल्ले, कुलदीप परांडे आणि ऋषिकेश म्हेत्रे यांचा समावेश आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तीन दिवसांची मुदत दिली होती. मात्र, अद्याप अर्ज सादर करण्यात आलेले नाहीत. भाजपकडून अर्ज दाखल करण्यासाठी महिनाभराची मुदत मागण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवक निवडीचा प्रस्ताव असलेली महापालिकेची सभा १५ डिसेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. या सभेपूर्वी सातही अर्जांची छाननी पूर्ण होऊन ते वैध ठरणे आवश्यक आहे. अन्यथा स्वीकृत नगरसेवक निवडीचा मुहूर्त पुन्हा हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या जाहीर झालेल्या सात नावांना प्रत्यक्ष नगरसेवकपद कधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.











![[PCMC] भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा रखडली!](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/37ffe0d4-18b8-41fe-9f84-455db1fef12a-90x60.jpeg)





