- दिवाळीनंतरची भेट ठरली अखेरची..
- इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणारा १२ वर्षांचा रितेश आणि कुटुंबाचा आधार असलेला सिद्धांत काळाच्या पडद्याआड..
- मोशीतील बनकर वस्ती येथील हृदयद्रावक घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २७ नोव्हेंबर २०२६) :- दिवाळीच्या सणात कामामुळे भाच्याला भेटता आले नाही, म्हणून दिवाळी संपल्यानंतर त्याला भेटण्यासाठी मामा आला. मात्र, मामाची ही भेट दोघांच्याही आयुष्यातील अखेरची भेट ठरली. भाचा शेततळ्यात पडल्याचे पाहताच त्याला वाचवण्यासाठी मामाने पाण्यात उडी घेतली; पण नियतीचा घाला असा की, भाच्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मामाचाही जीव गेला. मोशीतील बनकर वस्ती येथे बुधवारी (दि. २५ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.
सिद्धांत उत्तम लगाडे (वय २१, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर, पुणे) आणि रितेश रमेश ताकपेरे (वय १२, रा. बनकर वस्ती, मोशी) अशी मृतांची नावे आहेत.
या घटनेतील सर्वाधिक काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग म्हणजे रितेशची आई आणि सिद्धांतची बहीण स्नेहा यांच्या डोळ्यांसमोर दोघेही पाण्यात बुडत होते. “माझ्या भावाला आणि माझ्या बाळाला कोणीतरी वाचवा रे…” अशी आर्त हाक देत त्या शेततळ्याच्या काठावर टाहो फोडत होत्या. मात्र, मदतीसाठी धावपळ सुरू असतानाच काळाने दोघांनाही हिरावून नेले.
रितेश पाचवीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करतात. वडिलांचे कष्ट पाहणाऱ्या रितेशने मोठे झाल्यावर इंजिनिअर बनून वडिलांचे कष्ट कमी करण्याचे स्वप्न पाहिले होते. अभ्यासात हुशार आणि मेहनती असलेल्या रितेशच्या अकाली मृत्यूने कुटुंबाचे स्वप्नच उद्ध्वस्त झाले.
दुसरीकडे, सिद्धांत बी.कॉम.चे शिक्षण घेत खासगी कंपनीत पार्टटाइम नोकरी करत होता. शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला आधार देण्याची त्याची धडपड सुरू होती. भाचा शेततळ्यात पडल्याचे समजताच त्याने क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली. मात्र, शेततळ्यात अस्तरासाठी वापरलेल्या प्लास्टिकच्या कापडामुळे दोघांनाही बाहेर येता आले नाही आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला.
गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. एका कुटुंबातील भाच्याचे भविष्य आणि दुसऱ्या कुटुंबाचा आधार एका क्षणात हिरावला गेला. रितेशचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न आणि सिद्धांतची कुटुंबासाठी सुरू असलेली धडपड अपूर्णच राहिली. या दुर्दैवी घटनेने ताकपेरे आणि लगाडे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.












![[PCMC] भाजपच्या सात स्वीकृत नगरसेवकांची निवड पुन्हा रखडली!](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/images-1-2-190x122.jpeg)




