- सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ फेब्रुवारी २०२६) :- वडमुखवाडीतील एका सोसायटीतील मेंटेनन्स निधीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०१८ ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुमारे ७० ते ८० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी विक्रम रामस्वरूप बक्षी (वय ५८, रा. दिघी) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सोसायटीसाठी तात्पुरत्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेल्या कार्यकारी समितीतील काही पदाधिकाऱ्यांनी आणि संबंधित सदस्यांनी संगनमत करून सभासदांकडून गोळा केलेल्या मेंटेनन्स निधीचा गैरवापर केला.
आरोपींमध्ये तापकिर, काशीकर, घुटक, सावते, घोलप, तापकिर, गावगर, दौडकर, अडसुळ, देशमुख, तापकिर आणि सलगर यांचा समावेश आहे.
तक्रारीनुसार, मेंटेनन्सच्या रकमेतून मोठी रक्कम अपहार करून त्या व्यवहारांना वैध ठरवण्यासाठी बनावट ऑडिट अहवाल तयार करण्यात आला. संबंधित ऑडिटरनेही या प्रक्रियेत मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सोसायटीतील सभासदांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वरे पुढील तपास करत आहेत. पोलीस प्रशासनाने संबंधित आर्थिक कागदपत्रांची छाननी सुरू केली असून, दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.












