- प्रकल्प महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १४ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड ही विशेष उद्देश कंपनी (SPV) पुढील महिन्यात गुंडाळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्या अनुषंगाने महापालिकेने प्रशासकीय प्रक्रिया वेगात केली आहे. कंपनीची सर्व कामे आणि प्रलंबित प्रकल्प टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या संबंधित विभागांकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शुक्रवारी (दि. १३) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत महापौर रवी लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. महापौर लांडगे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
बैठक पुण्यातील विभागीय कार्यालयात पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान शहरात राबविण्यात आलेल्या विविध स्मार्ट सिटी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. पूर्ण झालेल्या कामांची तसेच अंतिम टप्प्यातील उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली.
दरम्यान, मार्च २०२६ अखेर कंपनी अधिकृतरीत्या बंद करण्याचे नियोजन आहे. ऑटो क्लस्टर येथील कंपनीचे कार्यालयही बंद करण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रकल्पांची देखभाल आणि पुढील अंमलबजावणी महापालिकेकडे येणार असल्याने शहर प्रशासनासमोर आता सातत्य आणि कार्यक्षमतेचे आव्हान असणार आहे.












