सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी २०२६):- इंद्रायणी नगर, भोसरी येथील एचपी पेट्रोल पंपासमोरील हॉटेल टीप टॉप चौकात रविवारी (दि. २२) सकाळी साडेदहाच्या सुमारास झालेल्या अपघातात १९ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल अनिल कोटावले (वय १९) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो सकाळी घरातून कामावर जात असताना हा अपघात घडला.
इंद्रायणी कॉर्नरकडून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या छोट्या टेम्पोने टीप टॉप चौकात उजवीकडे वळताना विशालच्या दुचाकीला घासले. धडक टाळण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या ट्रक च्या मागील भागावर जाऊन आदळली.
या धडकेत विशाल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी यश अनिल कोटावले (वय २१, रा. सद्गुरुनगर, भोसरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात टेम्पो चालक तसेच नो-पार्किंगमध्ये ट्रक उभा करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.












