न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२३ फेब्रुवारी २०२६):- अंधश्रध्दा,अस्वच्छता निर्मुलनासाठी आयुष्यभर आपले जीवन व्यतीत करणारे थोर समाजसुधारक, कीर्तनकार संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता हीच खरी सेवा मानून समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव रुजवणे ही आजच्या काळातील खरी गरज आहे. समाजात सकारात्मक बदल घडवायचा असेल तर त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या अभिवादन प्रसंगी नगरसदस्य अनुराधा गोरखे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते यशवंत कन्हेरे, विशाल जाधव, निखील दळवी, मुरलीधर दळवी, अर्थव साईकर, सुधीर जमदाडे, आकाश कांबळे तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता, समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलन यांसाठी केलेल्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी जागवली. त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून समाजात स्वच्छता व सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.












