- भाजपच्या नगरसेविका आरती चोंधे यांचा खा. बारणे यांच्यावर जोरदार पलटवार..
- ”आधी डांगे चौकातील सब वे कोंडीमुक्त” करा – नगरसेविका आरती चोंधे…
- सर्व सुरक्षा नियमांचं पालन होऊनच उड्डाणपूल खुला करण्याच दिलं आश्वासन…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०४ मार्च २०२६) :- औंध-रावेत बीआरटी रोडवरील रक्षक चौकातील उड्डाणपुलावरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी उड्डाणपूल उभारणीवरून कंत्राटदारसह अधिकाऱ्यांना दोष देत तीव्र उतारामुळे भविष्यात अपघात झाल्यास कन्सल्टंट, अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. आता यावरून प्रभाग क्रमांक २६ भाजपच्या नगरसेविका आरती चोंधे यांनी खा. बारणे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

त्या म्हणाल्या ‘दोन वर्षापूर्वी उड्डाणपुलाचे काम चालू असताना बारणे यांनी त्यावेळी पाहणी का केली नाही? आता प्रकल्प अंतिम टप्प्यात आल्यानंतरच तुम्हाला सुचत काय? महापालिकेच्या अभियंत्यांवर तुमचा विश्वास नाही का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
‘वाकड-बालेवाडी पुलाप्रमाणेच या पूर्णत्वास आलेल्या पुलाचं देखील खासदार बारणे यांना भिजत घोंगड ठेवून नेमका कुणाचा विकास करायचा आहे? हे त्यांनी आधी हे स्पष्ट करावे’, असा अप्रत्यक्षपने टोला लगावत खा. बारणे यांना ”आधी डांगे चौकातील सब वे कोंडीमुक्त” करण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दरम्यान भाजपा नगरसेविका आरती चोंधे यांनी बुधवारी प्रत्यक्ष पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नगरसेविका चोंधे म्हणाल्या, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्र. २६ विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड येथील रक्षक चौकात उड्डाणपूल (ओव्हर ब्रिज) व अंडरपासचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम आता पूर्णत्वास आले आहे. महापालिकेच्या सबंधित विभागाच्या अभियंत्यांनी ‘आयआरसी नियमांनुसारच काम केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे तांत्रिक त्रुटींची शक्यता कमी आहे. सर्व सुरक्षा नियमांचं पालन होऊन लवकरच या पुलाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
उड्डाणपूल आणि अंडरपासमुळे औंधकडून रावेतकडे जाणारी वाहतूक अधिक सुरळीत होईल. वाकड फाट्यावरून औंधकडे जाणाऱ्या वाहनांचा वेळ वाचणार आहे. पिंपळे निलख गावातून पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर, सिग्नलमुक्त व वेगवान होणार आहे.
– आरती चोंधे, नगरसेविका भाजपा…















