- या प्रकरणात दाखवलेली तत्परता इतर प्रकरणांतही दिसून येईल काय?..
- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दररोज घरफोडी व चोरीच्या घटना घडत असतानाही अनेक गुन्ह्यांचा तपास महिनोनमहिने प्रलंबित राहतो. मात्र सांगवी परिसरातील एका घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या तेरा दिवसांत आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केल्याने इतर प्रकरणांबाबतही पोलिसांनी अशीच तत्परता दाखवावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सांगवी पोलीस ठाण्यात घरफोडी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी एका घरातून सुमारे पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट-१ कडून सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान सांगवी ते वारजे माळवाडी परिसरातील सुमारे २०० ते २५० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे ३५ वर्षीय महिलेला (रा. रामनगर, वारजे माळवाडी, पुणे) ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तिच्याकडून सुमारे आठ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. तसेच तपासात सांगवी पोलीस ठाण्यातील आणखी एका घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली देत एकूण दोन गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या कारवाईमुळे पोलिसांची कार्यक्षमता दिसून आली असली तरी शहरात घडणाऱ्या इतर अनेक घरफोडी आणि चोरीच्या प्रकरणांचा तपास अद्यापही संथ गतीने सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये तपासाला गती मिळत नसल्याने आरोपी मोकाट फिरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एका प्रकरणात दाखवलेली तत्परता इतर प्रकरणांतही दिसून यावी, अशी मागणी नागरिक आणि फिर्यादींकडून होत आहे.












