- महिलांचा ‘लेडी सिंघम’ पुरस्काराने सन्मान…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० मार्च २०२६) :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिखली येथील ‘आयआयबीएम’ (IIBM) कॉलेजमध्ये महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावर्षी संस्थेच्या वतीने महिलांना आगळ्यावेगळ्या ‘ लेडी सिंघम’ सन्मानाने सन्मानित करण्यात आले. समाजात वावरताना महिलांनी अधिक धाडसी आणि कणखर बनावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या व कॉलेजच्या संचालिका शितलताई धनंजय वर्णेकर, नगरसेविका सोनम विनायक मोरे, विभागप्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, डॉ. गरिमा मलिक आणि प्राध्यापिका भारती चौगुले, कु. सपना गोरे, विद्यार्थिनी कु. अंकिता कंकणवाडी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह म्हणून महिलांना गॉगल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला कॉलेजचे प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, अनिकेत वंजारी, संदीप जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. केवळ कर्मचारीच नव्हे, तर विद्यार्थिनींनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. “भविष्यात सिंघमसारखे धाडस ठेवून स्वतःचे भविष्य घडवा,” अशा शुभेच्छा यावेळी विद्यार्थिनींना देण्यात आल्या.
या प्रेरणादायी उपक्रमामुळे महिला कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, अशा कार्यक्रमांमुळे कामाची नवी ऊर्जा मिळते आणि भविष्यात मोठी झेप घेण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
”आजच्या काळात महिलांनी केवळ शिक्षित होऊन चालणार नाही, तर त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ‘सिंघम’सारखे धाडसी होणे काळाची गरज आहे. IIBM संस्थेचा हा ‘लेडी सिंघम’ उपक्रम महिलांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा आहे. महिलांनी आपल्यातील शक्ती ओळखून प्रत्येक क्षेत्रात निर्भयपणे पुढे यावे.”
– कु. प्रतिक्षा डफळ (विभागप्रमुख, आय आय बी एम कॉलेज)“ विद्यार्थिनींनी स्वतःची स्वप्ने बाजूला न ठेवता ती पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करावेत व आपल्या आईचे एक स्वप्न तरी आपण पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थिनीना आणि महिलांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
– शितलताई धनंजय वर्णेकर (नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या आणि संचालिका, IIBM कॉलेज)…












