न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जून २०१९) :- श्री क्षेत्र देहू, इंद्रायणी नदी प्रदुषणामुळे हजारो देवमासा व खवले मासे मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन, असा गंभीर प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्वतोपरी उपाययोजना राबवुन यातील दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला झाली. तदृनंतर मार्च २०१७ ला एका धार्मिक कार्यक्रमा निमित्त आपण श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे आला होता. त्यावेळी जाहीर कार्यक्रमात पवित्र इंद्रायणी प्रदुषण हे पिंपरी चिंचवडकरांचे पाप आहे. असे वक्तव्य केले होते. त्यावर निवडणुकीत आम्ही पिंपरी चिंचवडकर आपल्यासाठी माय- बाप होतो. आता निवडणुक उरकली आम्ही पापी झालो काय? खरे तर शहरातील इंद्रयणी व पवना नदी प्रदुषण रोखण्याबाबत सन २०१४ पासून आपण व आपले सरकारच अपयशी ठरले. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांबरोबर आपण व आपले सरकारी ही तितकेच जवाबदार व पापाचे वाटेकरी आहात. त्यामुळे आता तरी या नद्या प्रदुषणाबाबत शक्यतो सर्वतोपरी उपाययोजना राबवाव्यात अशी जाहीर मागणी केली होती. मात्र सत्तेचे राजकारण, वेगवेगळ्या निवडणुका, उमेदवार पळवापळवी यामध्येच आपला वेळ अधिक गेला. त्यामुळे या नदी प्रदुषणाच्या महत्त्वाच्या गंभीर विषयावर ठोस काम झाले नाही.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ प्रस्थान १५ दिवसावर आले असताना प्रशासनाकडून सोहळ्याची लगभग सुरु असताना श्री क्षेत्र देहु गाव येथील पवित्र इंद्रायणीच्या पात्रात किना-यावर अज्ञात कारणाने (रविवार दि.०९) हजारो मृत मासे आढळले. इंद्रयणी नदीमध्ये मागील तीन दशकांतील ही तिसरी मोठी घटना मानली जाते. इंद्रायणी नदीच्या काठावरील गावांचे व देहू गाव परिसरातील गावांचे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडले जाते. तसेच इंद्रायणीत जलपर्णी वाढत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील गेल्या दोन वर्षापासून सांडपाणी प्रक्रिया (एसटीपी / मलनि:सारण योजना) प्रकल्प तयार झाला आहे. मलनि:सारण वाहिन्याही टाकल्या आहेत. मात्र हा प्रकल्प वेळेत पुर्ण झाला असता. तर या माशांचा जीव निश्चित वाचला असता, असेही भापकर म्हणाले.
शहरातील इंद्रायणी व पवना नदी पात्रात रसायन मिश्रीत दुषित पाणी, वेगवेगळे केमिकल युक्त पाणी, सांडपाणी, वाढती जलपर्णी, शेवाळ यामुळे या नद्या “गटारगंगा” होत आहे. इंद्रायणी व पवनेचे पाणी याच कारणाने दुषीत होत आहे. दुषीत झालेल्या पाण्यातील ऑक्सिजन (प्राणवायू) संपुष्ठात आल्याने माशांचा मृत्यु होतोय. त्यामुळे आपण स्वत: वेळ काढून जातीने लक्ष घालून इंद्रायणी, पवना नद्यांच्या उगमापासून शहरापर्यंत तज्ञांकडून तपासणी करुन घेऊन ह्या नद्या प्रदुषीत होऊ नये म्हणून सर्वतोपरी उपाययोजना राबवुन यासाठी दोषी असणा-यांवर कठोर कारवाई कराव, असे या पत्रात भापकर यांनी म्हटले आहे.











