- पालिकेच्या पर्यावरण विभागाचा भलत्याच कामात ‘इंटरेस्ट’..
- शिवसेनेचे राजेंद्र तरस यांचा प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 26 मार्च 2026) :- पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल ३८ लाख नागरिकांची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीचे प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनासमोर आता आणखी एक गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. रावेत येथील मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाखाली थेट नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर राडारोडा टाकण्याचा खुलेआम प्रकार सुरू आहे. महापालिका प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करत असून पावसाळ्यात या भागातील नागरिकांना आपत्तीला सामोरे जाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
मोठमोठ्या हायवा गाड्यांमधून आणलेला भराव नदीपात्रात टाकला जात आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी हा प्रकार सुरू आहे. पुनावळे आणि रावेत या दोन्ही बाजुंनी नदीपात्रात सुमारे चाळीस फूट खोल भराव टाकण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्र झपाट्याने अरुंद होत आहे. येत्या पावसाळ्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागातील पानलोट क्षेत्रातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येते. मात्र, या भरावामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा होण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका नेरे, जांबे, सांगवडे, दारुंब्रे यांसह सुमारे दहा गावांना बसू शकतो. नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती असून, घरात पाणी शिरून शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
सर्वात गंभीर बाब म्हणजे, हा राडारोडा नेमका कोण टाकत आहे, याचा अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे. “घटना घडल्यानंतर जागे होण्याऐवजी प्रशासन आताच का कारवाई करत नाही ?” असा थेट सवाल रावेतवासियांकडून विचारला जात आहे.
“पवना माईची अक्षरशः दुर्वस्था केली जात आहे. नदीचे संरक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेच्या पर्यावरण विभागाची आहे. मात्र, पर्यावरण विभागाला इतर कामांसाठी वेळ असतो, पण नदीच्या सुरक्षेसाठी वेळ मिळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. या संदर्भात आयुक्त, महापौर आणि पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने तोडगा काढण्याची मागणी करणार आहे. तरीही प्रश्न सुटला नाही, तर मला रस्त्यावर उतरावे लागेल.”
– राजेंद्र तरस, अध्यक्ष, शिवसेना युवासेना मावळ लोकसभा…
“राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रावेत येथील नदीपात्रावर रस्त्याचे काम सुरू असून त्यासाठी तात्पुरता भराव टाकण्यात आला आहे. त्यांच्या कामाबाबत त्यांनी महापालिकेला माहिती दिली आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नदीपात्रातील टाकलेला भराव ते स्वतः काढून टाकणार असून नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.”
– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका














