न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ जून २०२६) :- संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखालील वारकरी संप्रदायावरील तैलचित्रांची तातडीने दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून साकारलेली ही तैलचित्रे सध्या गुटखा व पानाच्या पिचकाऱ्यांमुळे खराब झाली असून परिसराचे विद्रूपीकरण होत आहे. पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी या मार्गाने प्रवास करणार असल्याने तैलचित्रांना नव्याने रंगरंगोटी करून परिसराचे सुशोभीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
यामुळे वारकरी संप्रदायात चैतन्य निर्माण होईल तसेच शहराची स्वच्छ आणि सांस्कृतिक प्रतिमा जपली जाईल. याबाबत महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सचिन काळभोर यांनी व्यक्त केली आहे.
















