न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ जून २०२६) :- आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या सत्याग्रहींचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय यांनी आणीबाणीचा इतिहास उलगडत कार्यकर्त्यांना लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचे आवाहन केले.
भारतीय म्हणाले, भारतीय जनता पक्षाचा उगम हा आणीबाणीच्या काळातील संघर्षातून झाला असून, ‘संघर्ष’ हाच पक्षाचा डीएनए आहे. इतिहास केवळ वाचण्याचा नाही, तर तो समजून घेण्याचा विषय असल्याचे सांगत त्यांनी नव्या पिढीने लोकशाही रक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे सांगत त्या काळात अनेक राष्ट्रभक्तांनी तुरुंगवास व छळ सहन करूनही लोकशाहीसाठी संघर्ष केल्याचे नमूद केले.
यावेळी आणीबाणीत सत्याग्रह करणाऱ्या व मिसा कायद्यांतर्गत कारावास भोगलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा ‘लोकशाही रक्षक पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास आमदार उमाताई खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, माजी आमदार अश्विनी जगताप, मोरेश्वर शेडगे, शर्मिला बाबर, अभिषेक बारणे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
















